कोणाचा झेंडा घेऊ हाती?

Foto
35 व्या वर्धापन दिनी संभाजीनगरच्या शिवसैनिकांसमोर उभा राहिला यक्षप्रश्‍न

औरंगाबाद, दि. 8 ः मुंबई, ठाण्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात शिवसेनेचा झेंडा पहिल्यांदा फडकला तो ‘संभाजीनगर गडावर’. गेल्या 35 वर्षांपासून ‘संभाजीनगर’चा हा गड शिवसेनेसाठी अभेद्य समजला जात होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या गडाचा एक अजिंक्य बुरुज कोसळला. आज 35 व्या वर्धापन दिनी हा संपूर्ण गड  दोन भागात विभागला गेल्याचे दुर्दैवी चित्र शिवसैनिकांना ‘याची डोळा’ पाहण्याची वेळ आली आहे. संघटनेतील दोन मातब्बर समजल्या जाणार्‍या प्रस्थांमध्ये वर्षभरापासून सुरू असलेल्या भाऊबंदकीने वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने टोक गाठले आणि तमाम निष्ठावान शिवसैनिकांपुढे प्रश्‍न उभा राहिला, ‘कोणाचा झेंडा घेऊ हाती’.
8 जून 1985 या दिवशी शिवसेनेची मुंबई, पुणे, ठाणे नंतरची पहिली शाखा औरंगाबादच्या संभाजीपेठेत स्थापन झाली. आजचा शाखेचा हा 35 वा वर्धापन दिन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वर्धापन दिनानिमित्त सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात मनोरंजन व प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि शिवसैनिकांबरोबर स्नेह भोजन  हे ठरलेले असायचे. गुलमंडीवर संध्याकाळी सत्यनारायण पूजेचाही कार्यक्रम होत आला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या कार्यक्रमांना मर्यादा येणे सहाजिकच होते. त्या प्रमाणे यावर्षी वॉर्डा-वॉर्डा रक्‍तदान शिबिर व आरोग्य तपासणी असे कार्यक्रम 1 जूनपासूनच सुरू होते.
खैरेंच्या वर्चस्वाला धक्‍का 
शिवसेनेच्या स्थापनेपासून संघटनेत चंद्रकांत खैरे यांचे मोठे प्रस्थ. 1988 च्या पहिल्या निवडणुकीपासून 2019 पर्यंत खैरे कायम सत्तेच्या वर्तुळात राहत आलेले आहेत. तत्पूर्वी शहरप्रमुख, उपशहरप्रमुख पदी राहून अगदी सुरुवातीच्या काळात संघटनात्मक उभारणीचे कामही त्यांच्या नावे आहे. नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार ही सत्तेची सर्व पदे त्यांच्याकडे चालत आली होती. त्यामुळे औरंगाबादची शिवसेना म्हणजे चंद्रकांत खैरे असे एक नकळत समिकरण तयार झाले होते. या काळात संघटनेतील अनेकांनी खैरेंच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला. पण मातोश्रीचे आशीर्वाद कायम खैरेंच्याच पारड्यात पडत गेले. या एकहाती कारभाराला 2019च्या निवडणुकीतील पराभवाने तडा गेला आणि पहाता पहाता इतके दिवस दबा धरून बसलेले पक्षांतर्गत विरोधकांनी डोके वर काढणे सुरू केले. 1998 मध्ये भाजपमधून शिवसेनेत आलेले अंबादास दानवे काही काळातच शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख पदापर्यंत पोहचले. त्यांनी अत्यंत कुशलतेने खैरेंच्या विरोधात मजबूत मोर्चे बांधणी करीत आपले स्वतःचे निशाण फडकवले.  खैरे निवडणूक हरले आणि नेमके त्याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्‍कम पाठिंब्यामुळे अंबादास दानवे विधान परिषदेवर निवडून गेले. या परिस्थितीचे प्रतिबिंब वर्षभरापासून संघटनेच्या विविध कार्यक्रमानिमित्त पडत राहीले. आजच्या वर्धापन दिनानिमित्त शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच गुलमंडी बरोबरच क्रांतीचौकातही ध्वजारोहण करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांना शिवसेनेच्या जवळपास सर्व स्थानिक प्रमुख कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. मात्र क्रांतीचौकातील सकाळी 9.30 च्या आ. दानवेंच्या कार्यक्रमाकडे खैरेंनी पाठ फिरवली. तर गुलमंडीवरील 10 वाजेच्या खैरेंच्या कार्यक्रमाकडे दानवेंनी जाण्याचे टाळले. शिवसेनेच्या संघटनात्मक मांडणीत शिवसेना नेते या पदाला मोठी प्रतिष्ठा आणि वलय आहे. चंद्रकांत खैरे हे शिवसेना नेते आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रातील ते एकमेव नेते आहेत. खैरे आणि दानवे दोघेही संघटनेतील बिगबुल मानले जातात. त्यांच्यातील दुहीचा विपरित परिणाम संघटनेवर होणार हे ओघानेच आले. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शिवसैनिक आज दोन मोठ्यातील वादांमुळे अडचणीत आले आहेत. आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा या दुहीचे अतिशय ओंगाळवाणे चित्र ठळकपणे दिसत होते.
खैरे तनवाणींची वाट पाहतात तेव्हा 
गुलमंडीवर शिवसेनेचे सुरुवातीपासून वर्चस्व आहे. पूर्वीच्या मराठा हायस्कूलच्या परिसरात 1989 पर्यंत शिवसेनेचे कार्यालय होते. त्यामुळे या भागाला शिवसेनेच्या जडणघडणीत वेगळे महत्त्व आहे. वर्धापन दिनाचे कार्यक्रम गुलमंडीवरच होत आले आहेत. चंद्रकांत खैरे खरं म्हणजे कार्यक्रमाला उशिरा येण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आजच्या कार्यक्रमाला ते अगदी वेळेवर उपस्थित होते आणि दानवेंनी कार्यक्रमाला यावे यासाठी अन्य पदाधिकार्‍यांमार्फत त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र दानवेंनी दाद दिली नाही तर माजी आ. किशनचंद तनवाणी यांच्यासाठी खैरे अर्धातास वाट पाहवी लागली.